(मतीन शेख)
बुलढाणा: महावितरणकडून संग्रामपुरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला नागरिकांचा तीव्र विरोध होत असून, या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता आणि कोणतीही सूचना न देता मीटर बसविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संतप्त वीज ग्राहकांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना २२ एप्रिल रोजी निवेदन देत आपली नाराजी व्यक्त केली. ग्राहकांच्या अनुपस्थितीत घरात प्रवेश करून स्मार्ट मीटर बसविण्याची पद्धत ही अन्यायकारक व मनमानी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे जबरदस्तीने मीटर बसविणे तात्काळ थांबवावे, अशी ठाम मागणीही करण्यात आली. दरम्यान, यापुढे जर संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर महावितरणविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीस महावितरणच जबाबदार असेल, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, लोकशाही मार्गाने मांडलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संघटना आक्रमक भूमिका घेईल. या निवेदनावर विजय विठ्ठल ठाकरे, विजय दिनकर मारोडे आणि शरद कैलास अढाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

