Sunday, November 22, 2026
HomeUncategorized‘उभा गतिरोधक’ वादात तामगाव चर्चेत; गिनीज बुकमध्ये नोंदीची ग्रामस्थांची मागणी

‘उभा गतिरोधक’ वादात तामगाव चर्चेत; गिनीज बुकमध्ये नोंदीची ग्रामस्थांची मागणी

(मतीन शेख)

 

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील एका रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ‘उभ्या गतिरोधका’मुळे गावात मोठा वाद निर्माण झाला असून, या अनोख्या प्रकाराची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत निखिल घिवे (भैय्या पाटील) यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, तामगाव ग्रामपंचायत सध्या अनियमित कारभार आणि एकहाती सत्तेमुळे चर्चेत असून, ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गावातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर उभारण्यात आलेला गतिरोधक हा नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा, ‘उभा’ असल्याने तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हा गतिरोधक सरपंचांच्या घरासमोरच उभारण्यात आल्याने त्यामागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या कामामध्ये ठेकेदार, सरपंच, सचिव आणि कार्यकारी अभियंता यांच्यात आर्थिक व्यवहार व दबावाचे राजकारण झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पाण्याच्या निचऱ्याच्या कारणास्तव हा गतिरोधक उभारण्यात आल्याचीही चर्चा आहे. तामगाव हे वर्दळीचे गाव असून, बोडखा, भिलखेड, काकोडा, कवठळ, चोंडी आदी गावांकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने होते. मात्र, या उभ्या गतिरोधकामुळे वाहनचालकांसह लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः त्या ठिकाणी अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने धोका अधिक वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधकाची मागणी केली होती; मात्र संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने हा ‘उभा’ गतिरोधक उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्षात उभारलेली रचना ही मंजूर मोजमापांशी सुसंगत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने स्थळ पाहणी करून कार्यकारी अभियंत्यांसह संबंधितांना उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत, तसेच ग्रामस्थांना या कामामागील उद्देश आणि परिणाम याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत संबंधित गतिरोधक हटविण्यात आला नाही, तर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा निखिल घिवे यांनी दिला असून, यामुळे तामगावातील वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!