(मतीन शेख)
बुलढाणा: रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोठी कारवाई करण्यात आली असून देशी दारूचा साठा व वाहनांसह तब्बल १ लाख २४ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार दि.२० मे रोजी ही विशेष कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशन रायपूर हद्दीतील ग्राम खोर व भारज चौफुली परिसरात छापेमारी करताना महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी देशी दारूचे ६ बॉक्स किंमत २४ हजार रुपये तसेच २ मोटारसायकल वाहन किंमत १ लाख रुपये असा एकूण १ लाख २४ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत हेड कॉन्स्टेबल अनंता फरताळे, हेड कॉन्स्टेबल सुनील मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश वाघ व महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.