(मतीन शेख)
बुलढाणा : पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असताना ट्रॅक्टर व जेसीबीसाठी डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेक पेट्रोल पंप चालकांकडून कॅन किंवा बॅरेलमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर दि.१८ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदारांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. युवा जिल्हाध्यक्ष विजय विठ्ठल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या नांगरणी, वखरणी व इतर मशागतीची कामे सुरू असून ट्रॅक्टर हे शेतीचे प्रमुख साधन बनले आहे. मात्र पेट्रोल पंपांवरून कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार ट्रॅक्टर पंपावर न्यावे लागत आहेत. यामुळे वेळ, इंधन व पैशांचा अतिरिक्त खर्च होत आहे. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना या समस्येचा अधिक फटका बसत असून शेतीकामे रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याची व ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पडताळणी करून सुरक्षित पद्धतीने कॅन किंवा बॅरेलमध्ये डिझेल देण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी विजय ठाकरे, शरद पाटील आढाव, निलेश हागे, ज्ञानेश्वर कुयटे, विजय मारोडे, शंकर मानखैर, दशरथ वानखडे, उमेश उकर्डे, ज्ञानेश्वर भवर, सागर सोडे, मंगेश मारोडे, रामदास चोपडे, परमेश्वर बाणेरकर, विशाल मुरुख, पवन ठाकरे, अतुल बांगर, संतोष रणशिंगे, सोहम मारोडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

