(मतीन शेख)
अकोट : रमजान ईद काही दिवसांवर येऊन ठेपली असून या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील ईदगाह परिसर तसेच अल्पसंख्यांक बहुल भागांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अकोट नगर परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठान यांनी याबाबत संबंधित प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत. अकोट शहरातील विविध भागांतील पाणी, स्वच्छता, वीज व रस्ते आदी सुविधांबाबतच्या समस्या आमदार पठाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. याबाबत त्यांचे स्वीय सहाय्यक सैय्यद अहमद तसेच अकोट नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या नगमा अजहर शेख यांनी निवेदन देत परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर आमदार पठाण यांनी त्वरित दखल घेत अकोट नगर परिषद प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ईदच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक नमाज अदा करण्यासाठी ईदगाह येथे उपस्थित राहतात. हे लक्षात घेऊन दोन्ही ईदगाह परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय कलदार चौक ते मोठी ईदगाह या मार्गाची दुरुस्ती करून वाहतुकीची सोय सुरळीत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने अकोट नगर परिषद स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, पोलिस प्रशासन तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी ईदगाह व इफ्तेखार प्लॉट परिसराची पाहणी केली. येत्या रमजान ईद तसेच पुढील सणांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या पाहणी दरम्यान माजी नगरसेवक अजहर शेख, आमदार साजिद पठाण यांचे स्वीय सहाय्यक सैय्यद अहमद, नगरसेवक शेख ख्वाजा, नगरसेवक डॉ. युसुफ खान, समाजसेवक मोहम्मद अजीम इनामदार, सरफराज परवेज, आजम सरकार, वसी पेंटर आदी उपस्थित होते.