(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या देशीदारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनाळा पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेत १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास दुनकी बु. ते वसाडी रोडवरील मोतीलाल मोरे यांच्या घराजवळ करण्यात आली. याप्रकरणी अक्षय चरणदास वर्गे वय २६ व सागर किसन वर्गे वय २६, दोघेही रा.करमोळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस कर्मचारी विनोद शिंबरे यांनी पंचांसमक्ष पोलीस पथकासह छापा टाकला. यावेळी आरोपींकडून एका पोत्यामध्ये ९० एमएल क्षमतेच्या ‘टेंगो पंच’ देशीदारूच्या एकूण १५० सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत ५० रुपये असा ७ हजार ५०० रुपयांचा साठा आढळून आला. तसेच आरोपी अवैधरित्या देशीदारूची वाहतूक करत असताना त्यांच्याकडून लाल रंगाची होंडा युनिकॉर्न कंपनीची दुचाकी क्र. एम.एच.२८ बी एक्स ९९८१ जप्त करण्यात आली. या दुचाकीसह एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (अ) व ८३ अन्वये सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शाकीर पटेल करीत आहेत.