(मतीन शेख)
बुलढाणा: मोबाईल हॅक करून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचे खाजगी फोटो व संदेश मिळवून तिची बदनामी करण्याची धमकी देत दीर्घकाळ मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने पीडित महिलेचा मोबाईल हॅक करून तिच्या व्हॉट्सॲप व ई-मेलमधील खाजगी फोटो, व्हिडिओ आणि मेसेज मिळवले. त्यानंतर ते फोटो व मेसेज तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तिला फोनवर वारंवार बोलण्यास भाग पाडले. तसेच तिच्याशी बोलत राहण्याची मागणी करत नकार दिल्यास खाजगी फोटो व मेसेज गावात तसेच नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या शिवाय आरोपीने पीडित महिलेच्या संमतीविरुद्ध अनेकवेळा व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले. त्या वेळी आरोपीने चोरून स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हिडिओ पीडित महिला व तिच्या बहिणीला पाठविल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडित महिलेचा प्रत्यक्ष तसेच मोबाईलद्वारे वारंवार पाठलाग करत तिच्या पती, बहिण व इतर नातेवाईकांना फोन करून शिवीगाळ व धमक्या दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिस ठाण्यात कायम दखलपात्र गुन्हा क्रमांक ६७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७५(१), ७५(२), ७७, ७८, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ई) व ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे करीत आहेत.