(मतीन शेख)
संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाबबाबा काटेलधाम येथे दि.१३ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने मयत सभासदांच्या वारसांना विम्याचे धनादेश वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला. या कार्यक्रमात सहकार विद्या मंदिर, वरवट बकाल येथे शिक्षण घेत असलेल्या इयत्ता नववीतील विद्यार्थी प्रणव विजय सैरीसे यांच्या आई लक्ष्मी विजय सैरीसे यांचा काही दिवसांपूर्वी शेतातून येत असताना बैलगाडीवरून पाय घसरून चाक डोक्यावरून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या वारस विजय सैरीसे यांना बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच बुलढाणा अर्बन बँकेच्या वरवट बकाल शाखेचे मयत सभासद राजेंद्र नरसिंगराव देशमुख (रा. वानखेड) यांचा विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या नावावरील वेअरहाऊस तारण कर्जाच्या पाच लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेशही राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते त्यांच्या वारसांना देण्यात आला. यावेळी डॉ. किशोर केला यांनी बुलढाणा अर्बन बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत सांगितले की, बँकेचे सभासद, कर्जदार तसेच सहकार विद्या मंदिरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विमा काढण्यात येतो. या उपक्रमामुळे संकटकाळात कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेश्यामजी चांडक होते तर उद्घाटन अपर्णा कुटे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामकृष्ण मस्के, वसंत चिंचोले, दिलीप नागरिक, अशोक तायडे, नंदू तायडे, मनीष कोळपकर, बी. जी. पाटील, प्रा. डी.एस. लहाने, नरेंद्र पालंद्रीकर, भारती महाराज, राजेंद्र ठाकरे, भैयाभाऊ बकाल, घनश्याम राठी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे प्राचार्य योगेश घाटोळे, राजेश लोहिया, प्रकाश भुते, राजीव पुंडे तसेच शाखा व्यवस्थापक भूपेंद्र अवचार, संतोष केला, राजेश गांधी, शाम देवकर, मनोज गांधी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.