(मतीन शेख)
बुलढाणा : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात बुलढाणा पोलिसांनी उघडलेली मोहीम अधिक आक्रमक होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे “एक्का बादशहा” जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ५ लाख १२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कठोर मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रभावी कारवाया केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. दि.१७ मे रविवार रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अचानक धाडसत्रामुळे जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेचे आणि धाडसी कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेकॉ.दिगंबर कपाटे, महिला हेकॉ. वनिता शिंगणे, एनपीसी. राकेश नायडू, पोकॉ अमोल शेजोळ, पोकॉ. जयंत बोचे, पोकॉ अमोल अंभोरे, पोकॉ अजिस परसुवाले, पोकॉ मनोज खर्डे व चालक पोकॉ शिवानंद हेलगे यांच्या विशेष पथकाने अत्यंत शिताफीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.

