(मतीन शेख)
यवतमाळ: शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या नाकाबंदी आणि रात्रगस्तीदरम्यान डी.बी. पथकाला मोठे यश मिळाले आहे. धामणगाव रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी सोलर वायर चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १६ मे च्या रात्री परिसरात डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीदारामार्फत पोलिसांना चोरीचा माल घेऊन काही संशयित धामणगाव रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने तत्काळ परिसरात सापळा लावला. दरम्यान, पोलिसांना पाहताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले. आरोपींकडून ओरिएंट कंपनीच्या सोलर वायरचे १२ बंडल जप्त करण्यात आले. या मालाची किंमत ३ लाख १८ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल किंमत अंदाजे ९० हजार रुपये ही जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ८ हजार ६०० रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अक्षय भास्कर सहारे वय ३२, सचिन भीमराव मेश्राम वय ४५ आणि प्रदीप भास्कर नंदेश्वर वय ३८ यांचा समावेश आहे. तिघेही यवतमाळ शहरातील जबराई नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी सतिश अशोक वडनलवार यांच्या फिर्यादीवरून यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पोहवा रावसाहेब शेंडे, पो.शि. गौरव ठाकरे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.