(मतीन शेख)
बुलढाणा: नाती फक्त रक्ताचीच नसतात, तर विश्वासाची आणि माणुसकीचीही असतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा ‘बुलढाणा अर्बन’ परिवाराने दिला आहे. श्री संत गुलाब बाबा काटेलधाम येथे आयोजित दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याच्या पवित्र वातावरणात, आपल्या हक्काचा माणूस गमावलेल्या दोन कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेचे प्रेरणास्थान राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांच्या हस्ते हे विमा धनादेश सुपूर्द करण्यात आले. आईची माया हरपली, पण शिक्षणाची वाट उजळली. सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वरवट बकाल येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रणव विजय सैरीसे याच्यावर नियतीने घाला घातला. शेतातून येताना बैलगाडीवरून पडून झालेल्या अपघातात त्याच्या आईचे लक्ष्मी सैरीसे यांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या प्रसंगी शाळेने घेतलेला विमा मदतीला धावून आला. भाईजींच्या हस्ते त्यांचे वारस विजय सैरीसे यांना १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी संस्थेने दिलेला हा आधार अत्यंत भावनिक ठरला. तसेच बुलढाणा अर्बन शाखा वरवट बकाल येथील मयत सभासद राजेंद्र नरसिंगराव देशमुख मुक्काम पोस्ट वानखेड यांचा मृत्यू विद्युत तारेच्या धक्क्याने झाला असून त्यांच्या वरील असलेलं कर्ज – वेअर हाऊस तारण कर्ज ५०६६४९/- (अक्षरी पाच लाख सहा हजार सहाशे एकोनपन्नास रुपये) चा धनादेश संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते देण्यात आला.
”बुलढाणा अर्बन केवळ बँकिंग व्यवहार करत नाही, तर प्रत्येक सभासद आणि विद्यार्थ्याच्या कुटुंबाची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे. संकटाच्या काळात ही मदत म्हणजे त्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी दिलेली फुंकर आहे.”
— राधेश्यामजी चांडक (भाईजी)
सदर दोन्ही धनादेश देत असताना आदरणीय डॉ. किशोरजी केला सर, तसेच संस्थेचे सर्व शाखा व्यवस्थापक, शाळेचे सर्व प्राचार्य, शिक्षक वर्ग उपस्थित होते. विम्याचा धनादेश सुपूर्द करत असताना आदरणीय भाईजी तसेच आदरणीय डॉ. किशोरजी केला यांनी बुलढाणा अर्बन परिवारा द्वारे होऊ घातलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची ओळख भाषणामध्ये करत असताना सांगितले की, जे सभासद बुलढाणा अर्बनचे असून ज्यांच्या वरती तारण कर्ज असेल अशांचा विमा संस्थेतर्फे काढण्यात येतो. तसेच सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथील जे विद्यार्थी शिकत असतात अशा विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सुद्धा शैक्षणिक फी मध्येच विमा शाळेतर्फे काढण्यात येत असतो. त्या अनुषंगाने सदर विमा देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, कार्यक्रमाचे उद्घाटक अपर्णाताई कुटे तसेच प्रमुख उपस्थिती रामकृष्ण मस्के, वसंतराव चिंचोले, दिलीप नागरिक, अशोक तायडे, नंदू तायडे, मनीष कोळपकर, बीजी पाटील, प्राध्यापक डी.एस. लहाने, नरेंद्र पालंद्रीकर, राम भारती महाराज, राजेंद्र ठाकरे, भैया भाऊ बकाल, घनश्यामभाऊ राठी तसेच परिसरातील प्रतिष्टीत मंडळी हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य योगेश घाटोळे, प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य प्रकाश भुते, राजीव पुंडे, अमित धूत तसेच बुलडाणा अर्बन शाखा व्यवस्थापक भूपेंद्र अवचार, संतोषजी केला, राजेश गांधी, शाम देवकर, मनोज गांधी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.