(मतीन शेख)
अकोला : अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध देशी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दि.३ एप्रिल रोजी प्रभावी कारवाई करत ५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण १ लाख ४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्राम शहापूर येथे हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे ७३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ग्राम अकोलखेड येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत १० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच ग्राम बोर्डी येथे १० हजार १०० रुपये, ग्राम मुंडगाव येथे ५ हजार २०० रुपये आणि करतवाडी येथे ५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व कारवायांमध्ये मिळून ५ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दादाराव लिखार, वासुदेव ठोसरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली.