(मतीन शेख)
अकोला : एकीकडे आकाशाकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे आणि दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेत कोमेजत चाललेली खरीप पिके, अशी अकोला जिल्ह्यातील परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून जिल्ह्याला दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश घोषित करण्याची मागणी पुढे आली आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. जिल्ह्यातील पर्जन्यमान, खरीप हंगामाची स्थिती आणि शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट याकडे त्यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत पीक परिस्थितीचा आढावा व शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना पावसातील खंडाचा पिकांवर होत असलेला परिणाम प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी पठाण यांनी केली. निवेदनानुसार, मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिकांना अपेक्षित पाणी न मिळाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, आधीच वाढलेल्या शेती उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिक वाढू शकते. या परिस्थितीत सरकारी कार्यालयातील अहवालांपुरते नुकसान मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणे आवश्यक असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड आणि प्रत्यक्ष झालेले नुकसान याचे सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार नुकसानभरपाई निश्चित करून ती शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार उपलब्ध असलेल्या शासकीय मदत व सवलती शेतकऱ्यांना लागू कराव्यात, अशी मागणी आमदार पठाण यांनी केली.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. “तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही,” असा इशारा आमदार पठाण यांनी दिला. आता प्रशासनाच्या प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल आणि त्यानंतर शासनाकडून घेतला जाणारा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. अकोला जिल्ह्यातील पावसाची स्थिती आणि खरीप पिकांचे संभाव्य नुकसान लक्षात घेता शासन शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.