(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद शहरातील गैरान नदी परिसरात शुक्रवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सिद्धार्थ नगर येथील महादेव वागोदे वय ५५ यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव वागोदे हे शौचासाठी नदीकाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या काठावर त्यांचा अचानक तोल जाऊन पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. पोहता न आल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही आणि ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सय्यद नफिज व इरफान चाऊस यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही भीती न बाळगता नदीत उडी घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी महादेव वागोदे यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सिद्धार्थ नगरसह संपूर्ण जळगाव जामोद शहरात शोककळा पसरली असून महादेव वागोदे यांच्या निधनाबद्दल नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी व प्रवाह वाढला असल्याने नदीकाठच्या परिसरात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

