(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यात ३० जुलैपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून शेतांसह गावातील अनेक रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. काही गावांमधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची माहिती समोर आली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीची गंभीर दखल घेत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी बाधित भागातील नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

