(मतीन शेख)
संग्रामपूर : चांगेफळ शेतशिवारातील बेंबळा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा नदीला अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव सुरेश तेरसिंग भाबर वय २६, रा. उसारणी, ता. खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश, सध्या मुक्काम इसाई, ता. जळगाव जामोद असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि.३१ जुलै दुपारी सुरेश भाबर हा भोलसिंग सोहनसिंग जमरा व इतरांसह बेंबळा नदीपात्रात मासेमारी करत होता. त्याचवेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो पाण्यात वाहून गेला. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी रात्रभर त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. शनिवारी सकाळी नदीतील पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर नातेवाईकांनी तामगाव पोलिसांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविली. यावेळी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी संरचनेत अडकलेल्या अवस्थेत सुरेशचा मृतदेह आढळून आला. घटनेबाबत मृताच्या नातेवाईकांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नसून तामगाव पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ३६/२०२६, कलम १९४ बीएनएसएस-२०२३ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

