(मतीन शेख)
बुलढाणा: वारी हनुमान मंदिर परिसरातील वान नदीच्या खोल डोहात बुडालेल्या तरुणाचा अखेर रविवारी सकाळी मृतदेह मिळून आला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने रात्रभर शोधमोहीम राबविली होती. मृत तरुणाची ओळख योगेश प्रकाश वानखडे वय २०, रा. खुटपुरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा अशी झाली आहे. तो शनिवारी दि.१ ऑगस्ट मित्रांसोबत वारी हनुमान मंदिर परिसरात फिरण्यासाठी आला होता. दुपारी सुमारे १ वाजता मंदिरासमोरील वान नदीच्या पात्रातील डोहात मित्रांसह पोहत असताना तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढलेला असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी आल्या. अखेर २ ऑगस्ट रविवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता युवकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शाकीर पटेल करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खुटपुरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

