(मतीन शेख)
मूर्तिजापूर : अवैध दारू विक्री प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनभोरा परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती संबंधितांना होती. या प्रकरणात पुढील कारवाई टाळण्यासाठी बीट जमादार कानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके यांनी संबंधित व्यक्तीकडून लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बाहकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या पथकाने अनभोरा येथे केली. नियोजीत सापळ्यात दोन्ही कर्मचारी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून तपास सुरू आहे. या कारवाईनंतर परिसरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.