(मतीन शेख)
बुलढाणा: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक झाड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज इको सायन्स पार्क वसाळी येथे वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. संत तुकाराम महाराजांनी “वृक्षावली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगातून मानवाला निसर्गाशी घट्ट नाते जोडण्याचा संदेश दिला आहे. मात्र वाढती जंगलतोड, प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. या गंभीर समस्यांबाबत जनजागृती व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. कार्यक्रमास वन समितीचे अध्यक्ष गोपाल कास्देकर, वन परीक्षेत्र अधिकारी वन्यजीव सोनाळा अजय बावणे तसेच (आरएफओ) सुधीर आंबेकर, वसाळी वर्तुळ वनपाल गजानन सोळंके, देव बेराड, अनिल पारधी, पवन जग्रवाल, दारासिंग धाडशिंबे, हरीओम बेठेकर, मगेश डोंगळे, राणी गरुड, लीला जामूनकर, ममता बेटेकर यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सौ. समजकोर बाबर, सदस्य रामा डावर, अंबाबरवा असोसिएशन युनियनचे अध्यक्ष खुमसिंग भाऊ डावर, उपाध्यक्ष रवी मांडलेवी, सचिव आरिफ केदार, सिकंदरसिंग बाबर, सुनील पालकर, मोतीलाल मोरे, सुकलाल डावर, सुमित पालकर, कृष्णा डावर, किशोरसिंग बाबर, नजीर पालकर, अशोक पालकर, किशोर सुरत्ने, अतुल पालकर तसेच अंबाबरवा अभयारण्यातील सर्व गाईड, जिप्सी चालक व मालक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून भावी पिढीसाठी हिरवेगार व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी गावातील नागरिकांना विविध प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.