(मतीन शेख)
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात एका आदिवासी महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी विविध विभागांत फिरावे लागल्याच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला स्ट्रेचर किंवा इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित महिलेला स्वतःच्या पाठीवर पतीला वाहून न्यावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षा रक्षक आणि वॉर्ड बॉय उपस्थित असूनही मदतीसाठी कोणीही पुढे आले नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार साजिद खान पठाण यांनी जीएमसी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. रुग्णसेवेसाठी असलेल्या संस्थेत अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळणे अत्यंत गंभीर असून यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डीन, डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी आणि वॉर्ड बॉय यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रुग्णालयातील सातत्याने समोर येणाऱ्या त्रुटींमुळे जीएमसीच्या डीन यांना तात्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणीही त्यांनी मंत्र्यांकडे केली. दरम्यान, आमदार पठाण यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जीएमसी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.