(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरजू नागरिकांसाठी नियोजित असलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकसह तांदूळ जप्त केला. या कारवाईत एकूण ४२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी भटटी कादर कासम वय ५५, रा.अरव शेरी, माळिया, जि.राजकोट गुजरात, वैभव सुनिल आटोळे वय २५, अंकुश केशन आटोळे वय २२ दोन्ही रा. कुरणगाड ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास जळगाव जामोद पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. दि.२८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील घोडेगाव फाटा परिसरात ट्रकमधून काळ्या बाजारासाठी तांदूळ नेला जात आहे. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून ट्रक क्रमांक जीजे ०३ सियु.२२८२ ताब्यात घेतला. या ट्रकमधून २४० क्विंटल सरकारी तांदूळ किंमत ६ लाख ७९ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक चालकाची चौकशी केली असता, त्याने सदर तांदूळ कुरणगाड बु. येथील विष्णु बाबाराव आटोळे यांच्या गोडावूनमधून भरल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने तत्काळ कुरणगाड येथील सदर गोडावूनवर छापा टाकला असता ३४४ क्विंटल तांदूळ किंमत १० लाख ३२ हजार तसेच तांदूळ मोजणीसाठी वापरण्यात येणारे वजन काटे, पोते शिलाई मशीन व इतर साहित्य किंमत ४० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. यासह ट्रकची अंदाजे किंमत २५ लाख असून, एकूण जप्त मुद्देमाल ४२ लाख ९२ हजार २०० इतका आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणीक लोढा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर स्थानीय गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भाग घेतला. पथकात पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे, पोहेकॉ. जगदेव टेकाळे, पोकॉ. अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, निलेश राजपूत, आणि चापोहेकॉ. विकास देशमुख यांचा समावेश होता.