Friday, September 18, 2026
HomeUncategorizedपाइपांनी भरलेले दोन ट्रक अडवले अन् चोरीचा भांडाफोड! अकोली जहाँगीर फाट्यावर अकोट...

पाइपांनी भरलेले दोन ट्रक अडवले अन् चोरीचा भांडाफोड! अकोली जहाँगीर फाट्यावर अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४३.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

(मतीन शेख)

 

अकोट : रात्रीच्या अंधारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवलेले पाइप दोन ट्रकमधून परस्पर हलविले जात असताना अकोट ग्रामीण पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून हा प्रकार उघडकीस आणला. अकोली जहाँगीर फाट्यावर केलेल्या कारवाईत दोन आयशर ट्रक पोलिसांच्या हाती लागले तर काही संशयित फोरव्हिलर मधून पसार झाले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून पाइपांसह तब्बल ४३ लाख ३९ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्री अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक नियमित गस्तीवर होते. यावेळी अकोली जहाँगीर फाटा परिसरात दोन आयशर ट्रकमधून मोठ्या प्रमाणात पाइप नेले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी वाहनांची चौकशी सुरू केली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच काही जण चारचाकी वाहन घेऊन तेथून पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही ट्रक व चालकांना ताब्यात घेतले. चालकांकडून वाहनातील पाइपबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. दोन्ही वाहने अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आली. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अकोट उपविभागाशी संपर्क साधण्यात आला. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ट्रकमधील पाइप हे पोपटखेड गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठेवण्यात आलेले असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये एकूण ८२ पाइपांची किंमत ९ लाख ३९ हजार २२८ रुपये असल्याचे समोर आले. या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४२/२०२६ दाखल करण्यात आला. बीएनएसच्या कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान ट्रक चालक मनीष अरुणराव मैन वय २९ नटाळा पुनर्वसन वर्धा आणि कपील अशोकराव दुधे वय ४१, पुजई, वर्धा यांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान झालेल्या तपासात प्रभाकर वसंतराव भताने वय ३९ गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर याचे नाव समोर आले असून, त्याच्या सांगण्यावरून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत दोन आयशर ट्रक, एक चारचाकी वाहन आणि चोरीचे पाइप असा एकूण ४३ लाख ३९ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीतील आणखी सदस्यांचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!