(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर गावातील रहिवासी गजानन पांडुरंग जगताप वय ५० हे ९ जूनपासून बेपत्ता झाले असून, त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याप्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. माहितीनुसार, ९ जून रोजी सकाळी घरातील पाणी भरून झाल्यानंतर गजानन जगताप यांनी कामावर जात असल्याचे सांगत घर सोडले. दुपारच्या वेळी मुलीने त्यांना जेवणासाठी घरी येण्याबाबत फोन केला असता, त्यांनी “लवकरच घरी येतो” असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संध्याकाळपासून त्यांचा मोबाईल फोनही बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा कोणताही मागमूस न लागल्याने अखेर १० जून रोजी सोनाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बेपत्ता गजानन जगताप यांचा रंग गोरा असून उंची सुमारे ५ फूट ६ इंच आहे. त्यांची शरीरयष्टी साधारण असून नाक सरळ आहे. चालताना किंचित कुबडेपणा जाणवतो. बेपत्ता होताना त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाच्या चप्पला परिधान केल्या होत्या. गजानन जगताप यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळल्यास तात्काळ सोनाळा पोलिस ठाण्याशी अथवा त्यांच्या नातेवाईकांशी ९९७००९८३२४ किंवा ८६६८६५१३७८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.