Saturday, June 13, 2026
HomeUncategorizedचार दिवसांच्या शोधानंतर गजानन जगताप यांचा विहिरीत मृतदेह; बावनबीरमध्ये शोककळा

चार दिवसांच्या शोधानंतर गजानन जगताप यांचा विहिरीत मृतदेह; बावनबीरमध्ये शोककळा

(मतीन शेख)

 

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील गजानन पांडुरंग जगताप वय ५० यांचा मृतदेह चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावात ‘गजू’ म्हणून परिचित असलेल्या गजानन यांच्या निधनाने बावनबीर गावावर शोककळा पसरली आहे. गजानन जगताप हे ९ जून रोजी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले होते. दुपारच्या सुमारास मुलीशी त्यांचा फोनवर संपर्क झाला होता. त्यावेळी त्यांनी लवकरच घरी परत येत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा मागमूस लागला नाही. अखेर १० जून रोजी सोनाळा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवार दि. १२ जून रोजी सायंकाळी बावनबीर येथील शेतकरी विकास गव्हाळे यांच्या वावरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच सोनाळा पोलिस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अखेर रात्री सुमारे ११ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेहाची ओळख गजानन पांडुरंग जगताप अशी पटली. घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गजानन जगताप हे जमादारीच्या माध्यमातून परिसरातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत होते. त्यांच्या स्वभावामुळे व सामाजिक जिव्हाळ्यामुळे त्यांचा गावात मोठा मित्रपरिवार होता. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सोनाळा पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीण असा आप्तपरिवार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!