(मतीन शेख)
बुलढाणा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सोनाळा पोलिस ठाण्याच्या वतीने रविवार दि.१३ सप्टेंबर रोजी सोनाळा शहरातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक खामगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ ते १२ या वेळेत हा रूट मार्च पार पडला. रूट मार्चमध्ये पोलीस दलाची मोठी उपस्थिती दिसून आली. यामध्ये २ अधिकारी, १८ पोलीस अंमलदार, १० नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार आणि ३५ गृहरक्षक दलाचे जवान, अशा एकूण ६५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि समाजकंटकांवर पोलिसांचा वचक राहावा हा रूट मार्चचा प्रमुख उद्देश होता. शहरातील संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचा मार्ग आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागातून पोलिसांनी संचलन केले. गणेशोत्सव हा शांतता, बंधुभाव आणि उत्साहाचा सण असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेशही या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला. “सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांमध्ये कायद्याची भीती” या भूमिकेतून सोनाळा पोलिस प्रशासन गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून दिसून आले.