Friday, September 18, 2026
HomeUncategorizedरुग्णालयाच्या समोरून दुचाकी चोरी; तपासाची चक्रे फिरली अन् १४ वाहनांचा पर्दाफाश! यवतमाळ...

रुग्णालयाच्या समोरून दुचाकी चोरी; तपासाची चक्रे फिरली अन् १४ वाहनांचा पर्दाफाश! यवतमाळ डीबी पथकाची कारवाई 

(मतीन शेख)

 

यवतमाळ : शहरातील शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीसमोरून चोरीला गेलेल्या मोटारसायकलीचा तपास करताना यवतमाळ शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीला जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत पोलिसांनी वृषभ शंकर टेकाम २७, रा. येरडगाव ता. बाबुळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत दुचाकी चोरीचे धक्कादायक प्रकरण समोर आले असून, पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. लोहरा येथील गणेश चरडे हे उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात आले होते. त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर रुग्णालयाच्या ओपीडीसमोर उभी केली. काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना मोटारसायकल जागेवर दिसली नाही. अज्ञात व्यक्तीने दुचाकी लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने चोरीच्या ठिकाणासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याचबरोबर तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान वृषभ टेकाम याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांचे पथक येरडगाव येथे पोहोचले. तेथे सापळा रचून वृषभ टेकाम याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने यवतमाळ शहर परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ शहराबरोबरच अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणि इतर जिल्ह्यांतून चोरी करण्यात आलेल्या दुचाकींची माहिती पोलिसांसमोर आली. त्यानुसार पोलिसांनी १४ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या असून, त्यांची अंदाजे किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून, आरोपीने यापूर्वी आणखी किती वाहने चोरली आहेत, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी आणि पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. कारवाईत सपोनि मिलिंद पराडकर, पोउपनि गणेश सपकाळ, पो.हा. रावसाहेब शेंडे, पो.शि. गौरव ठाकरे, पवन नांदेकर, मयूर तेल्लेवार, पवन तडसे, प्रदीप कुरडकर आणि कुणाल पांडे सहभागी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!