Saturday, September 19, 2026
HomeUncategorizedसातपुडा पत्रकार प्रेस क्लबची स्थापना; पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीचा निर्धार! ग्रामीण व आदिवासी...

सातपुडा पत्रकार प्रेस क्लबची स्थापना; पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीचा निर्धार! ग्रामीण व आदिवासी भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा संकल्प

(मतीन शेख)

 

संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल भागातील पत्रकारांना संघटित व्यासपीठ मिळावे, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि ग्रामीण भागातील जनसमस्या प्रभावीपणे शासन-प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने सातपुडा पत्रकार प्रेस क्लबची स्थापना करण्यात आली. बुधवार दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी वसाडी येथील इको सायन्स पार्क येथे परिसरातील पत्रकारांची बैठक झाली. सोनाळा, टुनकी, बावनबीर, वसाडी, आलेवाडी तसेच परिसरातील विविध गावांमधील पत्रकार बैठकीस उपस्थित होते. पत्रकारांचे हक्क व अधिकार, पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणे, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणे, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, व्हॉईस ऑफ मीडिया तालुका माजी अध्यक्ष नारायण भाऊ सावकार तसेच डॉ. झाडोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारांनी संघटितपणे कार्य करताना पत्रकारांच्या हक्कांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

 

कार्यकारिणी जाहीर

 

बैठकीत सातपुडा पत्रकार प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सतीश व्ही. वानखडे यांची निवड करण्यात आली. ते पुण्यनगरी व महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी आहेत. कार्याध्यक्षपदी रफी शेख, उपाध्यक्षपदी कासम सुरत्ने व आनंद खंडेराव, सचिवपदी अशोक अकोटकार, सहसचिवपदी सुभाष मालते तर प्रसिद्धीप्रमुख पदी कैलास खोटट्टे यांची निवड करण्यात आली. तसेच ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार म्हणून संतोष आगलावे आणि चंद्रप्रकाश कडू यांची निवड करण्यात आली. यावेळी मनीष लोहिया, प्रभुदास पारस्कर, मतीन शेख, डॉ. समीर शेख, भगवंता चोरे, सुनील बावणे, श्याम बोरपी यांच्यासह परिसरातील अन्य पत्रकार उपस्थित होते. सातपुडा पत्रकार प्रेस क्लबच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील पत्रकारांच्या अडचणी, पत्रकारांची सुरक्षितता व हक्क, पत्रकार भवनाचा प्रश्न, सामाजिक उपक्रम, जनजागृती तसेच नागरिकांच्या विविध समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जाणार आहेत. पत्रकारांच्या एकजुटीला बळ देत सातपुडा परिसरातील पत्रकारितेला नवी दिशा देण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!