(मतीन शेख)
संग्रामपूर : आयुष्यभर माणुसकीची नाळ जपत, प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे जमनादास गांधी यांचे १४ सप्टेंबरच्या रात्री अकोला येथील ओझोन रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वानखेडसह वरवट बकाल आणि परिसरावर शोककळा पसरली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या मनात ‘भाऊ’ म्हणून विशेष स्थान निर्माण करणारे जमनादास गांधी हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर अनेकांसाठी आपुलकीचा आधार होते. कोणाविषयीही ईर्षा अथवा निंदा न करता प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाच्या नात्याने त्यांनी असंख्य माणसे जोडली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी गावकऱ्यांसाठी अधिकच वेदनादायी ठरली आहे. सन १९८० च्या सुमारास त्यांनी वरवट बकाल येथील संग्रामपूर रोडवर हार्डवेअर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या व्यवसायामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळाली. पुढे या भागात अनेक दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने उभी राहिली आणि या परिसराची ओळखच ‘गांधी मार्केट’ म्हणून निर्माण झाली. व्यवसायासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीही तितक्याच जिद्दीने जपली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत परिस्थितीनुसार गरजू शेतकऱ्यांना विहिरीतील मोटारी, बोअरवेल मशीन तसेच शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला आधार मिळाला. माणूस मोठा की लहान, श्रीमंत की गरजू, असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाशी ते प्रेमाने वागत. योग्य वेळी मार्गदर्शन करणे, अडचणीत मदतीला धावून जाणे आणि प्रत्येकाशी मैत्रीचे नाते निर्माण करणे, हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर ‘आपला माणूस हरपला’ ही भावना प्रत्येकाच्या मनातून व्यक्त होत होती.
आई-वडिलांच्या समाधीस्थळी भावपूर्ण निरोप
वानखेड येथील त्यांच्या मळ्यात, आई-वडिलांच्या समाधी परिसरात १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते. भाऊंच्या निधनाच्या शोकभावनेत वरवट बकाल येथील गांधी मार्केटमधील दुकानदार व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात जमनादासजी गांधी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. माणूस निघून जातो; मात्र त्याने जोडलेली माणसे, केलेली मदत आणि समाजासाठी केलेले कार्य त्याची आठवण कायम जिवंत ठेवते. ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ या भावनेने वानखेडवासीयांनी आपल्या लाडक्या ‘भाऊंना’ अखेरचा निरोप दिला.