(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर महसूल मंडळातील हवामान केंद्र गेल्या काही काळापासून बिघाड अवस्थेत असल्याने मृग बहर पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांच्या भरपाईवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पर्यायी हवामान नोंदी ग्राह्य धरून विमा भरपाईचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी बावनबीर येथील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार १५ जून ते १५ जुलै या कालावधीत शेतकऱ्यांनी मृग बहर पीक विमा उतरविला. मात्र, या कालावधीत बावनबीर महसूल मंडळातील हवामान केंद्र बंद असल्यामुळे आवश्यक हवामान नोंदी उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी १ ते ९ जुलैदरम्यानचा हवामान डेटा शेजारील सोनाळा महसूल मंडळातील केंद्रावरून घेण्यात आला. शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ज्या पद्धतीने जुलै महिन्याचा डेटा सोनाळा महसूल मंडळाचा स्वीकारण्यात आला, त्याचप्रमाणे १५ ते ३० जून या कालावधीतील हवामान नोंदीही सोनाळा केंद्राच्या आधारावर ग्राह्य धराव्यात. तसेच त्यानुसार निश्चित होणारा ट्रिगर बावनबीर महसूल मंडळालाही लागू करावा. अन्यथा नियमांनुसार वेळेत विमा भरूनही अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी तातडीने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर योगेश पुंडे, भूषण माळोकर, योगेश इलामे, भास्कर इलामे, अर्जुन गव्हाळे, श्रीकृष्ण घायल, राजेश बेलोकार या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

