(मतीन शेख)
बुलढाणा: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इयत्ता चौथी–२०२६ च्या अंतरिम निकालात जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, टुनकी (बु.) ने शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. परीक्षेला बसलेले सर्व २४ विद्यार्थी पात्र ठरल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे. या निकालात कु. पूनम प्रभुदास परासकर हिने २५६ गुण (८५.३३ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. रुमन अकबर सुरत्ने हिने २५४ गुण (८४.६६ टक्के) मिळवून द्वितीय, तर कु. वैष्णवी श्रीकृष्ण निबोंळकर हिने २३२ गुण (७१.३३ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेची मान उंचावली आहे. या यशामागे मुख्याध्यापक संजय इंगळे यांचे प्रभावी नेतृत्व, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत हे प्रमुख घटक ठरले. वर्गशिक्षिका मनीषा इंगळे यांच्यासह विश्वजीत वाक्टे, संजय दमधर, इफ्रान सुरत्ने, रवींद्र चाटे, निलेश पवार, सचिन कात्रे, श्रुती लाहोटी आणि प्राजक्ता मेहरे यांनी विद्यार्थ्यांकडून नियमित सराव करून घेत स्पर्धा परीक्षेची प्रभावी तयारी करून घेतली. मर्यादित सुविधा असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या बळावर हा शंभर टक्के निकाल शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शाळेच्या या यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात अशीच यशस्वी परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

