(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील कवठळ शेत शिवार परिसरात ५ एप्रिलच्या मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पोलीस दलातच खळबळ उडाली आहे. गस्त घालत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये चक्क एका पोलीस अंमलदाराचा समावेश असल्याने ‘रक्षकच भक्षक’ अशी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार संतोष तुळशीराम आखरे हे सहकारी प्रमोद मुळे यांच्यासह रात्री पेट्रोलिंग ड्युटीवर होते. कवठळ शिवारात गुप्तधन काढले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रत्यक्षात तेथे कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नाही. पाहणी करून परत येत असताना रस्त्यात दोन संशयित व्यक्ती दिसून आल्या. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेत पोलीस कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ करत हल्ला चढवला. या हल्ल्यात राजेश गव्हाळे पोलीस अंमलदार, उरळ पोलीस स्टेशन, जि.अकोला व त्याचा भाऊ मनोज गव्हाळे यांनी कथितपणे सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी स्टीलच्या कड्याने संतोष आखरे यांच्या पाठीवर व कपाळावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच साक्षीदार प्रमोद मुळे यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.