(मतीन शेख)
बुलढाणा: अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग ऍक्शन मोडवर आले आहे. चांगेफळ येथे अवैध रेती वाहतूक करणारा एक टिप्पर महसूल विभागाच्या पथकाने जप्त करून तामगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. सदर वाहन हे संदीप गावंडे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई दि.३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता नायब तहसीलदार विकास शिंदे, नायब तहसीलदार राहुल वसावे आणि ग्राम महसूल अधिकारी संतोष खारोळे यांच्या संयुक्त पथकाने केली. दरम्यान, याच्या एक दिवस आधी म्हणजे दि.२ जानेवारी २०२६ रोजी रात्री देऊळगाव फाट्याजवळ अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना ग्राम महसूल अधिकारी संतोष खारोळे यांना दमदाटी व मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी करण गाडे याच्याविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग दोन दिवसांत महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या ठोस कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून महसूल विभागाच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

