(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु. येथील जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष श्रीधर भाऊ चोरे, सदस्य प्रभुदासभाऊ पारस्कर, राजुभाऊ बोदडे तसेच फुले-शाहू-आंबेडकर वाचनालयचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र भाऊ इंगळे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भाषणे, गीतगायन व चारोळ्या सादर केल्या. इयत्ता दुसरी तसेच सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्यनाट्य कलाकृती “फुले-सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?” हे विशेष आकर्षण ठरले. फुले-शाहू-आंबेडकर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचन स्पर्धेत इयत्ता पहिलीचा शिवांश राजू आपतुरकर याने प्रथम क्रमांक, इयत्ता पाचवीची उन्नती माधव टोपले हिने द्वितीय क्रमांक तर इयत्ता पाचवीचा प्रणव प्रभुदास पारसकर याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना वाचनालयाच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरव कुलकर्णी (इयत्ता सहावी) यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणव पारसकर (इयत्ता पाचवी) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय दामधर, विश्वजीत वक्टे, इप्रान सुरत्ने, सचिन कात्रे, निलेश पवार, रवींद्र चाटे, तसेच कु. प्राजक्ता सातव, कु. मनीषा इंगळे व कु. श्रुती लाहोटी या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

