Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedडायल ११२ वर खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल; सोनाळा पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध...

डायल ११२ वर खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल; सोनाळा पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

(मतीन शेख)

 

बुलढाणा: डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०जुलै रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत डायल ११२ एमडीटी वाहनावरील पोलिस पथक कर्तव्यावर होते. सायंकाळी ७:३६ वाजता प्राप्त झालेल्या पहिल्या आपत्कालीन कॉलमध्ये लाडणापूर येथे दारूच्या नशेत असलेला एक व्यक्ती वाद घालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र, कॉल करणाऱ्याने नंतर स्वतः पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असल्याचे सांगितल्याने संबंधित इव्हेंट बंद करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ७:५१ वाजता त्याच परिसरातून पुन्हा एक कॉल प्राप्त झाला. घटनास्थळी पोहोचल्यावर कॉल करणारी व्यक्ती कोण आहे, याबाबत उपस्थित नागरिकांनी माहिती दिली नाही. संबंधित मोबाईल क्रमांकाच्या चौकशीत तो क्रमांक राजू रामभाऊ भालतिडक रा. लाडणापूर यांचा असल्याचे समोर आले. मात्र, त्यांनी आपण कॉल केला नसल्याचा दावा करत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, “तुम्ही पोलिस असूनही माझे काही करू शकत नाही,” असे म्हणत पोलिसांशी उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप आहे. यानंतर रात्री ८:३२ वाजता त्याच मोबाईल क्रमांकावरून पुन्हा डायल ११२ वर कॉल प्राप्त झाला. यावेळीही संबंधित व्यक्तीने कॉल केल्याचे नाकारत पोलिसांची दिशाभूल केली. तसेच मोठ्याने बोलून पोलिसांना धमकीवजा इशारा देत घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण करून डायल ११२ या आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी राजू रामभाऊ भालतिडक रा. लाडणापूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१२ अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!