(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील मौजे सावळी, पेसोडा, खिरोडा व देऊळगाव घाट परिसरात पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या उपसा करून शासकीय ई-क्लास जागेवर साठवून ठेवलेली रेती तहसील प्रशासनाने जप्त केली. जप्त करण्यात आलेली ही रेती शासनाच्या नियमानुसार २० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आली. तसेच तहसील कार्यालयातील सुरू असलेल्या शासकीय बांधकामासाठी आवश्यक रेती रॉयल्टी (स्वामित्वधन) भरून संबंधित ठेकेदारास उपलब्ध करून देण्यात आली. मागील महिनाभरात संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल विभागाने अचानक धाडी टाकून ही कारवाई केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विकास शिंदे, नायब तहसीलदार राहुल वसावे, मंडळ अधिकारी तांबारे, ग्राम महसूल अधिकारी भोसले तसेच महसूल विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. जप्त करण्यात आलेली रेती कवठळ, मारोड, चांगेफळ आणि सावळा येथील एकूण २० घरकुल लाभार्थ्यांना महाखनिज प्रणालीद्वारे त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपीच्या आधारे नियमानुसार वितरित करण्यात आली. या लाभार्थ्यांना एकूण १०० ब्रास रेतीचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय, संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामासाठी शासकीय ठेकेदार परळीकर यांना अंदाजे १० ब्रास रेती नियमानुसार स्वामित्वधन (रॉयल्टी) भरल्यानंतर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.

