(मतीन शेख)
बुलढाणा: हुंड्यासाठी सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संग्रामपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायमा फिरदोस शेख फिरोज वय २३ हिचे माहेर शेगाव येथे असून तिचे सासर संग्रामपूर येथे आहे. सासरच्या मंडळींकडून वारंवार हुंड्याची मागणी केली जात होती. तसेच तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून सायमाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक शेख लुकमान शेख सुलेमान वय ५४, रा. सीतामाता मंदिराजवळ शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी शेख फिरोज शेख शरीफ, शेख शरीफ शेख मनू, शेख फरजाना बी शेख शरीफ आणि शेख शाहरुख शेख शरीफ सर्व रा. संग्रामपूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ८० व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

