(मतीन शेख)
मुंबई: भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज दि.४ डिसेंबर बुधवार रोजी झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर आता देवेंद्र फडणवीस आपल्या समर्थक आमदारांच्या नावांसह महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दुपारी ३:३० वाजता महायुतीचे नेते राजभवनावर जातील. महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे जागा मिळाल्या, त्यावरून पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे मानले जात होते. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत. या पूर्वीही ते मुख्यमंत्री राहिले आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्येही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती मात्र दोनच दिवसांनी त्यांना राजीनामा द्यावा लागला.

