(प्रतिनिधी | मतीन शेख)
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर या अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. सोयाबीन, कपाशी आदी सारखी प्रमुख पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या होत्या, मात्र मुसळधार पावसाने त्यांची मेहनत आणि आशा पाण्यात गेली आहे. “दरवर्षी संकटातूनच शेती करतो. यंदाही पिकं उगमाला आली होती, पण आता सगळं पावसाने संपवलं. कर्ज कसं फेडायचं?” अशी वेदना शेतकरी व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाल्याचे दृश्य मन सुन्न करणारे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून सरसकट कर्जमाफीसाठी जोरदार मागणी होऊ लागली आहे. शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली असून, या नैसर्गिक आपत्तीची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या पावसात केवळ पिकांचेच नव्हे, तर अनेक ठिकाणी जनावरांचेही प्राण गेले आहेत. काही दुर्दैवी घटनांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या नातेवाईकांचा जीवदेखील गमवावा लागला आहे. राज्य शासन व केंद्र सरकारने या संकटाचा त्वरित आढावा घ्यावा, पंचनामे करून मदतीची घोषणा करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. शेतकरी वर्ग आता सरकारकडून केवळ तात्पुरत्या घोषणा नव्हे, तर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करत आहे. “शेती ही निसर्गाशी जोडलेली आहे, पण सरकारने तरी आमच्या अश्रूंना किंमत द्यावी,” अशी भावनाही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

