(मतीन शेख)
बुलढाणा : जळगाव जामोद शहरातील काँटन मार्केट परिसरात जळगाव जामोद पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत २ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २६ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास काँटन मार्केटसमोर छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान आरोपी उत्तम शहादेव तायडे (वय ५५, रा. दानापूर, ता. तेल्हारा, जि. अकोला) याच्या ताब्यातून २ किलो ३७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत १ लाख १८ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय आरोपीकडून बजाज प्लॅटिना दुचाकी (एमएच ३० बीक्यू ०२४५) किंमत ७२ हजार रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत १२ हजार रुपये असा एकूण २ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने एका महिलेचे नाव सांगितल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. सपोनि नागेश प्रकाश मोहोड यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम ८(क) व २० (ब) (ii) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नारायण सरकटे करीत आहेत.