(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेख साजिद शेख कय्युम यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) मध्ये यशस्वी निवड मिळवून आपल्या संघर्षमय जीवनाला यशाची नवी दिशा दिली आहे. नुकतेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते प्रथमच गावात परतले असता ग्रामस्थांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि भव्य मिरवणुकीद्वारे जल्लोषात स्वागत केले. आर्थिक अडचणींनी वेढलेल्या कुटुंबात वाढलेल्या साजिद यांना लहानपणापासूनच कष्टाची सवय लागली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी गावोगावी फिरून साबुदाणा विक्री केली, तर पुढे ऑटो रिक्षा चालवत घराला आर्थिक हातभार लावला. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण आणि सरकारी सेवेत जाण्याचे ध्येय त्यांनी कधीही सोडले नाही. दिवसरात्र केलेल्या अथक मेहनतीचे अखेर फळ मिळाले आणि महाराष्ट्र सुरक्षा बलात त्यांची निवड झाली. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ते गावात दाखल होताच मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण बावनबीर गाव दुमदुमून गेले. गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. साजिद यांच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत तरुणांनीही मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या बळावर आपले ध्येय गाठावे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. साजिद यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

