(मतीन शेख)
बुलढाणा: मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या महिला व तिच्या मुलीला घराच्या पायरीवरून जाण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील कोळीपुरा परिसरात दि.२५ जुलै शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शितल दिलीप झाल्टे वय ३८ या आपल्या मुलीसह मंदिरात दर्शनासाठी जात असताना सकाळी ९:३० च्या सुमारास आरोपी सौ. मंगला डिगांबर कांडेलकर यांनी घराच्या पायरीवरून जाण्याचा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर चापट व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आरोपी सुनील दशरथ कांडेलकर यांनी काठीने हल्ला करून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ, कमरेच्या डाव्या बाजूस तसेच डाव्या खांद्यावर मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या. फिर्यादीच्या मुलीलाही चापट व बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच दोघींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्याद व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे सोनाळा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रमेश खरात करीत आहेत.

