(मतीन शेख)
बुलढाणा: शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या एकलारा–बावनबीर मार्गावरील वृक्षारोपण योजनेचा बोजवारा उडाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटनेने केला असून, या प्रकरणातील जबाबदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख कदीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खामगाव कार्यालयात अधिकारी एकनाथ तळेल यांना दि.२४ जुन रोजी निवेदन सादर करून सुकलेल्या वृक्षांची पाहणी व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. निवेदनानुसार, वरवट बकाल ते बावनबीर मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर वृक्षांच्या संगोपन व देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्ष सुकून नष्ट झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या उद्दिष्टालाही धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या निधीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. सुकलेल्या वृक्षांच्या जागी तातडीने नव्याने वृक्षलागवड करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. तसेच माहितीचा अधिकार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकायुक्त, पर्यावरण विभाग आणि न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करून न्याय मिळविण्यात येईल, असा इशारा शेख कदीर यांनी दिला आहे. या तक्रारीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

