(मतीन शेख)
बुलढाणा: धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या वक्तव्यांप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या वतीने आज दि.२५ जुन गुरुवार रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस सय्यद शफी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हे निवेदन सादर केले. पोलीस प्रशासनामार्फत ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. निवेदनात नाझिया इलाही यांनी इस्लाम धर्म, अल्लाह तआला आणि हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याविषयी कथितरीत्या केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करण्यात आला असून, या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक ऐक्य व शांततेला बाधा निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. समाजवादी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. भारतीय संविधानाने सर्व धर्मांचा सन्मान राखण्याचा अधिकार दिला असून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर नियंत्रण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी शेख नदिम, मुस्ताक जमदार, आरिफ डीजे, समीमभाई, शारीरिक अली, शेख राजू, शेख मुख्तार, तोसीफ बिल्डर, मिर्झा तहसीलम यांच्यासह समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

