(मतीन शेख)
संग्रामपूर : सोनाळा ग्रामपंचायतीतील रिक्त पदे तातडीने भरावीत व प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी आज दि.४ मार्च बुधवार पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात हे पाऊल उचलण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दि. १६ जुलै २०२५ रोजी पंचायत समिती, संग्रामपूर येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले. सोनाळा ग्रामपंचायतीत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांसारखी महत्त्वाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे व इतर सेवांसाठी विलंबाचा सामना करावा लागत आहे. २५ ते ३० वर्षे सेवेत असलेल्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना संबंधित रिक्त पदांवर संधी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांची आहे. याशिवाय, रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ती जाहिरात किंवा दवंडी न काढता पारदर्शकता पाळली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या उपोषणात राजेश उमाळे, गोविंदा देशमुख, देवासिंग कचवार, शेख आशिक, शंकर कांडेलकर व शरद लव्हाळे यांचा सहभाग असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

