(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील धाड येथे दोन गटात राडा होऊन दंगल सदृश्य परिस्थिती दि.३० नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, हजरत टिपू सुलतान रह. यांच्या मिरवणूक सुरु होती. दरम्यान फटाक्याची आतिषबाजी वरून काही समाजकंटाकांनी फटाके फोडू नये या वरून वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. बघता बघता दगडफेक सुरु होऊन गाड्याची सुद्धा जाळपोळ करण्यात आली असून त्या मध्ये दुचाकी, आॅटाेरिक्षा अशी १० वाहने जाळून टाकण्यात आली आहे. धाड येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दंगली दरम्यान काही वाहनांची तोडफोड करण्यात आली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले. यासोबतच शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.