Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedसोनाळा ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू

सोनाळा ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू

(मतीन शेख)

 

बुलढाणा: ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता, प्रलंबित चौकशी अहवाल आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोनाळा येथील ग्रामस्थांनी दि.१६ जुन मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव वाढला आहे. उपोषणकर्त्यांनी ग्रामपंचायतीतील कथित अवैध पदभरती प्रकरणाचा चौकशी अहवाल त्वरित जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच नियमबाह्य कर्मचारी नियुक्ती, बोगस ठराव प्रकरणातील दोषींवर कारवाई आणि नियमित ग्रामसभा न घेणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले आहे. सोनाळा ‘ड’ यादीतील रिमांडमध्ये टाकण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुल मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच गेल्या १५ वर्षांपासून सेवा देणाऱ्या ग्राम कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे, लिपिक व कारकून पदासंदर्भातील ठरावांच्या प्रती तसेच कार्यालयीन पत्रव्यवहाराची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी संबंधित ठरावांच्या प्रती देण्यात याव्यात. तसेच बसस्थानक परिसरात महिला व प्रवाशांच्या सोयीसाठी फिरते स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या उपोषणात सतीश वानखडे, श्रीकृष्ण झाल्टे, प्रकाश मात्रे, राजेश उमाळे, नितीन देशमुख, शंकर कांडेलकर, शेख आशिक, शेख गफूर, सुभाष मालटे आणि श्रीराम वावरे सहभागी झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!