(मतीन शेख)
अकोला: ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने अकोट शहर पोलिसांनी मॉडिफाईड सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात दि.१६ जुलै गुरुवार रोजी विशेष मोहीम राबवून २० दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. या कारवाईत संबंधित वाहनांवरील नियमबाह्य सायलेंसर जप्त करण्यात आले. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अनेक दुचाकींमध्ये कंपनीने मंजूर केलेल्या सायलेंसरऐवजी मोठा आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसविण्यात आल्याचे आढळून आले. अशा वाहनांमुळे ध्वनी प्रदूषणासह नागरिकांना मोठा त्रास होत असल्याने पोलिसांनी संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या प्रसंगी अकोट शहर पोलिसांनी वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर बदल करून ध्वनी प्रदूषण निर्माण करू नये, अन्यथा अशा वाहनधारकांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. ही मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नितेश बारहाते, पोलिस उपनिरीक्षक समाधान मिसाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश मोहिते, ट्रॅफिक अंमलदार पोकॉ शशिकांत इंगळे, पोकॉ निकेश सोळंके, पोकॉ वैभव वसु आदींनी सहभाग घेतला.

