(मतीन शेख)
बुलढाणा: सोशल मीडियावर अमिष दाखवून लोकांची फसवणूक करत लुटमार करणारी टोळी मलकापूर शहर पोलिसांनी केवळ तीन तासांत अटक करून जेरबंद केली. या प्रकरणातील सर्व पाच आरोपींना न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगर जि. ठाणे येथील तक्रारदाराला मोबाईलवर “एका लाखाचे पाच लाख” देण्याचे आमिष दाखवून मलकापूरात बोलावण्यात आले. त्यानंतर तक्रारदार व त्याच्या मित्राला ऑटोत बसवून शहराबाहेरील निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तेथे टोळीने मारहाण करून तक्रारदाराच्या गळ्यातील २०.६ ग्रॅम सोन्याची चैन किंमत १.५० लाख रुपये तसेच त्याच्या मित्राच्या खिशातील ४० हजार रुपये असा एकूण १.९० लाख रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. फिर्यादीकडील एका आरोपीचा फोटो मिळाल्याने डीबी पथकाने गोपनीय बातम्यांच्या आधारे शोध मोहीम राबवली. प्रथम प्रदीप सुरेश जैन वय ३८ रा. शास्त्रीनगर यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितल्यावर तीन स्वतंत्र पथके तयार करून पोलिसांनी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उर्वरित आरोपींना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. निखील संजय भोसले वय २५, सौरभ कैलास जैस्वाल वय २५, विशाल विजय वानखेडे वय २७, चेतन तानाजी व्यवहारे वय २२ सर्व राहणार मलकापूर अशी आरोपीचे नावे आहेत. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून माल मिळविण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावरून बाहेरील जिल्ह्यातील लोकांना अमिष दाखवून फसवून शहराबाहेर नेऊन लुटण्याच्या वारंवार तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची समजली जात आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे तसेच संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मलकापूर शहर पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत डीबी इंचार्ज सपोनी दिपक वारे आणि पथकातील पोकों आसिफ शेख, योगेश तायडे, संतोष कुमावत, नवल राठोड, सूरज चौधरी, प्रविण गवई, आनंद माने यांनी सहभाग घेतला.