(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातील अत्यंत होतकरू, मेहनती व सर्वांशी आपुलकीने वागणारे युवक अर्जुन तुळशीदास म्हसाळ यांचे २३ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुन म्हसाळ हा अत्यंत कष्टाळू, मितभाषी, शांत व संयमी स्वभावाचे होता. बांधकाम व स्टाईल व्यवसायातही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ओळख निर्माण केली होती. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबई येथे भरती प्रक्रियेसाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना आणि अथक परिश्रमांना ग्रामस्थांकडून विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

