(मतीन शेख)
बुलढाणा: अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज बुलढाणा जिल्ह्यात मोठी धडक कारवाई करत, मोताळा तहसीलचे कार्यरत तहसीलदार हेमंत पाटील यांना २ लाख रुपयांची लाच घेताना पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील लाचखोरीविरोधातील मोहिमेला मोठे यश लाभले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता शेतकऱ्याने वर्ग २ मधील जमिन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, या कामासाठी तहसीलदार हेमंत पाटील यांनी त्याच्याकडून २ लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधित शेतकऱ्याने लाच देण्यास नकार देत थेट अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर एसीबी च्या पथकाने आज दि.१४ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात सापळा रचला. या सापळ्यात तहसीलदार हेमंत पाटील लाच घेतांना पकडण्यात आले. त्यांनी मागितलेली संपूर्ण रक्कम स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरु आहे. या कारवाईत अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, पोलीस अंमलदार संदीप ताले, अस्लम शाह, दिगंबर जाधव व चालक नफीस यांनी मोलाची भूमिका बजावली. या आधीही अकोला एसीबीने बुलढाणा जिल्ह्यातील अनेक लाचखोरांवर कारवाया केल्या आहेत. मात्र सक्रिय पदावर कार्यरत असलेल्या तहसीलदाराच्या अटकेमुळे ही कारवाई विशेष ठरते.